अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणा-या दांपत्याला सळई आणि चाबकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातील मळगी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी छेड काढल्याचा जाब विचारल्याने आठ जणांनी मिळून त्यांनी सळई आणि चाबकाने मारहाण केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या एक महिन्यापासून आरोपी पीडित तरुणीची छेड काढत होते. विशेष म्हणजे तरुणीने यासंबंधी गावक-यांकडे तक्रारही केली होती. पण गावक-यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केलं होतं. गावक-यांनी प्रकरणाकडे कानाडोळा केल्याने तरुणीच्या आई-वडिलांनीच पुढाकार घेत आरोपींकडे विचारणा केली. मात्र आरोपींनी त्यांनाच बेदम मारहाण केली.

दरम्यान पोलिसांनी यासंबंधी आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. विनयभंग आणि पॉस्कोअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहेत.