तामिळनाडूमधील तिरुपूर येथे यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून एका महिलेची प्रसूती करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर रविवारी महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीने आपल्या दोन मित्रांसोबत मिळून प्रसूती केली होती. विशेष म्हणजे यांच्यामधील एकाही व्यक्तीला प्रसूती कशी करावी याबद्दल काही माहिती नव्हती.

क्रिथिगा नावाची ही महिला खासगी शाळेत शिक्षिका होती. तिचा पती कार्तिकेयन कपडा तयार करण्याच्या कंपनीत काम करतो. त्यांना तीन वर्षींची एक मुलगीदेखील आहे. ‘त्यांच्या पहिल्या बाळाची प्रसूती रुग्णालयात झाली होती. दुसऱ्या बाळाचा जन्म घरात व्हावा अशी क्रिथिगाची इच्छा होती’, अशी माहिती क्रिथिगाचे वडिल राजेंद्रन यांनी दिली आहे.

राजेंद्रन यांनी सांगितल्यानुसार, क्रिथिगाची मैत्रीण लावण्या हिने आपल्या घरातच बाळाला जन्म दिला होता, ज्यानंतर त्यांनीदेखील असंच करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘आपण व्हिडीओ पाहिला आहे, ज्यामध्ये महिला स्वत: घरात प्रसूती करण्यासाठी तयार झाली असल्याचं दिसत आहे’, अशी माहिती दिली.