अहमदाबादमध्ये पत्नीला दाढी असल्याचं सांगत घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या पतीची याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. पत्नीला दाढी असून तिचा आवाजही पुरुषांप्रमाणे असल्याचं सांगत पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र याचिका दाखल केल्यानंतर सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने याचिका रद्द केली आहे.

याचिकेत पतीने आरोप केला आहे की, पत्नीच्या कुटुंबियांनी आपली फसवणूक केली आहे. लग्नाच्या आधी आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर केस असल्याचं तसंच तिचा आवाज पुरुषांप्रमाणे असल्याचं आपल्याला माहित नव्हतं असा दावा त्याने केला आहे.

आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा पत्नीने बुरखा घातला होता. चेहरा पाहणं परंपरेच्या विरोधात असल्याने मीदेखील ती मागणी केली नाही असं पतीने याचिकेत सांगितलं आहे.

दरम्यान पत्नीने याचिकेवर उत्तर देताना, हार्मोन्ससंबधीच्या कारणामुळे आपल्या चेहऱ्यावर केस असून, उपचारानंतर ते जाऊ शकतात. पतीला मला घराबाहेर काढायचं असल्या कारणाने तसंच घटस्फोट हवा असल्याने उगाच काहीही कारणं देत आहेत असा आरोप महिलेने केला आहे.

दरम्यान पत्नीच्या वकिलांनी न्यायालयात आपली बाजू मांडल्यानंतर पुढील सुनावणींसाठी पती गैरहजर होता. वारंवार गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने याचिका रद्द केली आहे.