शहरात राहायचं की गावात ? या क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने पत्नीने आत्महत्या केल्याची अफवा पसरवण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या आदर्श नगर पोलिसांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. पोस्टमॉर्टममध्ये महिलेची गळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख हरियाणामधील रिटोली गावचा रहिवासी प्रदीप शर्मा अशी झाली आहे. आरोपी प्रदीप शर्मा दिल्लीतील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करायचा. मृत महिलेचं नाव सुमन असं होतं. सुमन आपल्या कुटुंबासोबत वजीरपूर येथे राहत होती. सुमनच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपुर्वी सुमन आणि प्रदीपचं लग्न लावून देण्यात आलं होतं. हे सुमनचं दुसरं लग्न होतं. तिच्या पहिल्या पतीचं तीन वर्षांपुर्वी निधन झालं होतं. यादरम्यान प्रदीप सुमनला घेऊन हरियाणामधील रिटोली गावात गेला होता. तिथे जाऊन सुमनवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. होळीच्या दिवशी सुमन माहेरी परतली आणि आपल्याला प्रदीप आणि त्याचे कुटुंबीय मारहाण करत असल्याचा आरोप केला.

सुमन त्यानंतर पुन्हा सासरी गेलीच नाही. प्रदीपने फोन करुन सुमनला आपल्या गावातील घरी पुन्हा परतण्यास सांगितलं. पण सुमनने तू दिल्लीत नोकरी करतो, तिथेच भाड्याने राहतोस त्यामुळे मीदेखील तुझ्यासोबत दिल्लीला राहणार असं सांगितलं. आपण गावी जाणार नसल्याचं तिने प्रदीपला सांगितलं. यावरुन प्रदीपचा पारा चढला आणि दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. 8 मार्चला प्रदीपने सुमनला फोन करुन तुझे काही कपडे इथे राहिले आहेत, ते घेऊन जा असं सांगितलं. जेव्हा सुमन घरी आली तेव्हा त्याने संधी साधत गळा दाबून तिची हत्या केली. 10 मार्चला पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रदीपला मुकरबा चौकातून अटक केली. चौकशी केली असता प्रदीपने क्षुल्लक कारणावरुन आपली रोज भांडण होत होती अशी माहिती दिली. आपल्याला सुमनला गावीच ठेवायचं होतं, पण ती तयार होत नव्हती म्हणूनच हत्या केली अशी कबुली प्रदीपने पोलिसांकडे दिली आहे.