पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुडगावमध्ये ही हत्या झाली आहे. विशेष म्हणजे करवा चौथच्या दिवशीच ही हत्या करण्यात आली आहे. पतीच्या दिर्घायुष्यासाठी उपवास ठेवणाऱ्या पत्नीला पतीच्या हातून आपली हत्या होणार आहे याची कल्पनाही नव्हती.

विक्रम चौहान असं आरोपी पतीचं नाव आहे. एका खासगी कंपनीत वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पदावर तो काम करतो. करवा चौथच्या रात्री त्याने आपल्या 32 वर्षीय पत्नी दीपिकाला आठव्या माळ्यावरुन धक्का देत हत्या केली. गुडगाव-फरिदाबाद रोडवर असणाऱ्या अन्सल वॅली व्ह्यू सोसायटीत ते राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या दीपिकाने त्यादिवशी करवा चौथचा उपवास ठेवला होता. रात्री त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर रागाच्या भरात विक्रमने तिला धक्का देत गॅलरीतून खाली ढकलून दिलं.

विक्रम आणि दीपिकाचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार आणि सहा वर्षांची दोन मुलंही आहेत. विक्रमचे त्यांच्याच सोसायटीमधील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. ‘ती महिला अनेकदा त्यांच्या घरी येत असे. यावरुन दोघांमध्ये भांडण व्हायचं’, अशी माहिती दीपिकाच्या वडिलांनी दिली आहे. जेव्हा दीपिका त्यांच्या संबंधावर आक्षेप घेत असे, तेव्हा विक्रम मारहाण करत असे असाही आरोप त्यांनी केला आहे.

विक्रमविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.