तामिळनाडूत आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून पळून गेलेला व्यक्ती तीन वर्षांनी सापडला आहे. विशेष म्हणजे टिकटॉकवर टाकलेल्या व्हिडीओमुळे त्याचा पत्ता लागला. विल्लूपूरम जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पुन्हा आपल्या कुटुंबासोबत घरी पाठवलं आहे.

सुरेश याचं जयाप्रदासोबत लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलंही होती. २०१६ मध्ये सुरेश आपल्या कुटुंबाला सोडून पळून गेला आणि परतलाच नाही. जयाप्रदा यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नातेवाईक, मित्र सगळ्यांकडे चौकशी करुनही सुरेशचा काही पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता, पण प्रगती काही झाली नव्हती.

काही आठवड्यांपुर्वी जयाप्रदा यांच्या एका नातेवाईकाला टिकटॉक अॅपवर सुरेशसारखा दिसणारा एक व्यक्ती दिसला. तिने जयाप्रदा यांना कळवलं असता हा आपला पती सुरेशच असल्याचं त्यांनी सांगितलं. जयाप्रदा यांनी तात्काळ पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी टिकटॉकच्या सहाय्याने सुरेशचा शोध लावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कौटुंबिक समस्यांमुळे सुरेशने आपल्या कुटुंबाला सोडलं होतं. मेकॅनिक म्हणून त्याने काम सुरु केलं होतं. तो एका तृतीयपंथासोबत संबंधातही होता. तिच्यासोबतच त्याने टिकटॉक व्हिडीओ तयार केला होता. तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या सहाय्याने पोलिसांनी सुरेशचा पत्ता मिळवला. पोलिसांनी सुरेश आणि जयाप्रदा यांच्याशी चर्चा करत सल्ला दिला आणि घऱी पाठवलं.