हैदराबादमधील स्फोटांप्रकरणी चौकशी करण्यासाठी इंडियन मुजहिद्दीनच्या दोन संशयित दहशतवाद्यांना आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिल्ली न्यायालयात केली आहे.
एनआयएने जिल्हा न्यायाधीश आय. एस. मेहता यांच्या न्यायालयात त्यासाठी याचिका केली असून न्यायालयाने सय्यद मकबूल आणि इम्रान खान यांना बुधवारी न्यायालयात सादर करण्यासाठी वॉरण्ट जारी केले आहे.
पुण्यात २०१२ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सदर दोघांना अटक केली असून सध्या ते तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या दोघांना न्यायालयात बुधवारी हजर करावे, असे न्यायालयाने तिहार कारागृह प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्याचवेळी त्यांना ताब्यात देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाझ भटकळ याच्या इशाऱ्यावरून मकबूल आणि इम्रान यांनी २०१२ मध्ये दिलसुखनगर भागाची रेकी केली होती. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून रियाझ भटकळ याची नक्की योजना जाणून घेण्यास मदत होईल, असे एनआयएने म्हटले आहे.