इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) या क्रिकेट स्पर्धेसाठीच्या ऑनलाइन बेटिंगमध्ये पैसे हरल्याने एका १९ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारा तरुण हा एक स्थलांतरित कामगार असल्याचं, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनू कुमार यादव (वय १९) असं या आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. तो मूळचा झारखंडचा असून कामानिमित्त हैदराबाद येथे राहत होता. येथील पंजगुत्ता भागातील द्वारकापुरी कॉलनीतील आपल्या भाड्याच्या घरातील बाथरुममध्ये त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तो आयपीएलवर बेटिंग खेळत असे, यामध्ये तो मोठी रक्कम हरल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा दावा त्याच्या भावांनी आणि मित्रांनी हा दावा केला आहे.

विशेष म्हणजे सोनू कुमारचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून अनेक वर्षांपासून तो आणि त्याचे दोन भाऊ हैदराबादमध्ये आजपर्यंत काम मजुरीचे काम करीत होते. सोनू कुमारला दारुचे आणि ऑनलाइन बेटिंगचे व्यसन जडले होते. त्याच्या भावांनी त्याला हे सर्व सोडून देण्याची समज दिली होती. त्यानंतर त्याने भावांना आपल्या मूळ घरी लवकरच येणार असून हे सर्व सोडून देईन असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्याने बेटिंगमध्ये मोठी रक्कम हरल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.