करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका अनेक लहान घटकांना बसला आहे. लॉकडाउन आणि अनलॉकच्या खेळात अनेक लोकं आजही घराबाहेर पडताना काळजी घेत आहेत. अशा परिस्थिती रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्या कमाईत लक्षणीय घट झाली आहे. अनेक रिक्षाचालक हे भाड्याची रिक्षा चालवतात. हैदराबादमधला मोहम्मद हबीबही त्यापैकीच एक. रिक्षाचं रोजंचं भाडं देऊन हातात अवघे काही रुपये शिल्लक राहणाऱ्या हबीबला घर कसं चालणार ही चिंता आहे. तरीही हार न मानता मोहम्मद हबीब नेहमी घराबाहेर कामासाठी पडतो आहे. आर्थिक अडचण असतानाही हबीबने आपल्या रिक्षात एक लाखापेक्षा जास्त रक्कम विसरुन गेलेल्या महिला प्रवाशाचे पैसे जबाबदारीने पोलिसांकडे परत केले. सुदैवाने आपण पैसे विसरल्याचं महिला प्रवाशाला लक्षात येताच तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि या प्रवाशाला पैसे मिळालेही.

काही दिवसांपूर्वी सिद्दी अंबर बाझार परिसरात मोहम्मदने आपल्या रिक्षातून दोन महिलांना सोडलं. यानंतर दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान मोहम्मद आपल्या नेहमीच्या स्टँडवर परतला. यावेळी पँसेजर सीटकडे पाहिलं असतान मोहम्महला एक बॅग दिसली. या बॅगेत कोणती घातक वस्तू तर नसेल ना या भीतीपोटी मोहम्मदने आपल्या रिक्षामालकाला ती बॅग दाखवली. बॅग तपासली असता त्यात पैसे असल्याचं कळलं. त्या बॅगेत १ लाख ४० हजारांची रक्कम होती. नेमक्या कोणत्या प्रवाशाचे पैसे आहेत हे शोधण्यात अर्थ नव्हता त्यामुळे हबीबने स्थानिक पोलीस ठाण्यात हे पैसे परत करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे हबीबने ते पैसे पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याआधी पैशांची खरी मालक असलेल्या आयेशा या महिलेने पोलीस ठाण्यात आपली बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

चौकशी केली असतान रिक्षाचालकाने परतवलेली बॅग हीच आयेशा यांची बॅग होती हे लक्षात आलं. यात कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती त्यामुळे आम्ही लगेचच ते पैसे आयेशा यांच्या ताब्यात दिल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी के. सुदर्शन यांनी दिली. मोहम्मद हबीब याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे आयेशा यांनी त्याला ५ हजार रुपये बक्षीस दिलं. पोलिसांनीही मोहम्मदचा शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आपल्यामुळे महिलेचे पैसे परत मिळाले याचा आनंद मोहम्मदला झाला होता.

“करोनामुळे लोकं घराबाहेर पडायला घाबरत आहेत. आमचा धंदाही कमी झालाय. मी दिवसभर रिक्षा चालवतो तेव्हा मोठ्या मुश्किलीने २०० ते ३०० रुपयांचा धंदा होतो. त्यातही २५० रुपये मला दिवसाचं भाडं द्यावं लागतं.” मोहम्मद हबीबने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली. याआधीही मोहम्मदने अशाच पद्धतीने रिक्षेत पैसे विसरुन गेलेल्या प्रवाशाला त्याचे पैसे परत केले होते.