भारतात प्लॅस्टिकची मोठी समस्या असून त्यावर मात करण्यासाठी विविध संशोधनं होत आहेत. दरम्यान, हैदराबाद येथिल सतीशकुमार या मेकॅनिकल इंजिनिअरने संशोधनाद्वारे अशाच प्रकारे प्लॅस्टिकच्या पुनर्वापराचा एक पर्य़ाय शोधला आहे. टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पुनर्वापरासाठी अनेकदा प्रक्रिया केल्यानंतर आणखी प्रक्रिया न होऊ शकणाऱ्या टाकाऊ प्लॅस्टिकपासून कृत्रीम इंधन तयार केले आहे.


सतीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, या टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीसाठी केवळ तीन टप्प्यातील रिव्हर्स इंजिनिअरिंगची प्रक्रिया वापरण्यात आली आहे. यासाठी टाकाऊ प्लॅस्टिक हे अप्रत्यक्षपणे निर्वात पोकळीत तापवले जाते, त्याला डिपॉलमराईज्ड करून वायूरूपात आल्यानंतर ते पुन्हा घनरुपात आणले जाते. त्यानंतर त्यावर विशिष्ट प्रक्रीया करून द्रवरूपात इंधन म्हणून वापरण्यात येते.

कुमार यांनी सांगितले की, अशा प्रकारे टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीसाठी त्याने २०१६मध्ये युनिटची निर्मिती केली. त्यानंतर त्याने ५० टन प्लॅस्टिक संपवले. यासाठी त्यांनी प्रामुख्याने स्वयंसेवी संस्थांनी गोळा केलेले तसेच मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर केल्यानंतर टाकाऊ प्लॅस्टिकचा साठा शिल्लक असणाऱ्या कंपन्यांकडून त्याने हे प्लॅस्टिक मिळवले.

या इंधननिर्मितीनंतर त्यांनी ते स्थानिक कंपन्यांना ४० ते ५० रुपये प्रति लिटर या दरात विकले. बेकरी उद्योगांनाही त्याने हे इंधन विकले, बेकरी पदार्थ भाजण्यासाठी भट्ट्यांमध्ये या इंधनाला मोठी मागणी आहे.

[jwplayer T7qrxu9q]