हैदराबादमधील एका व्यक्तीनं वाढदिवसाचा जंगी समारंभ केला होता. वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या त्या व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या वाढदिवसाला जवळपास १०० जणांची उपस्थिती होती. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सोन्याच्या व्यापाऱ्यानं आपल्या वाढदिवसाला १०० लोकांना आमंत्रित केलं होतं. त्या व्यक्तीचा आणि वाढदिवसाला उपस्थित असणाऱ्या अन्य एका व्यक्तीचा शनिवारी करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे वाढदिवसाला उपस्थित असणाऱ्यांची चिंता वाढली आहे. सर्वजण आपली करोना चाचणी करण्यासाठी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात गेले आहेत.

हैदराबादमधील आरोग्य आधिकाऱ्यांना असा संशय आहे की वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झालेला असू शकतो. करोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचं हैदराबादमधील हिमायतनगर परिसरात सोन्याचं दुकान आहे.

या व्यक्तीच्या वाढदिवसाला ज्वेलर्स असोसिएशनमधील १०० जणांची उपस्थिती होती. वाढदिवसाची पार्टी दिल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे दिसली होती. त्यानंतर त्या व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल केलं. शनिवारी त्या व्यपाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य आधिकारी त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत आहेत.