हैदराबादमधील दिलसुखनगर भागात गेल्या महिन्यात झालेल्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱयांनी बिहारमधील मुंगेर येथून आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 
एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या आठ जणांपैकी दोघांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. उर्वरित सहा जणांची सध्या चौकशी सुरू आहे. एनआयएचे पथक बुधवारी संध्याकाळी मुंगेरमध्ये दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला चौरामा गावात छापे टाकून आठ संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. या संशयितांबद्दल एनआयएच्या पथकाकडे आधीपासून माहिती होती.
मुंगेर येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी करण्यात आलेल्या सिमकार्डच्या साह्याने हैदराबाद बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱयांशी संपर्क ठेवण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानंतर काही मोबाईलच्या कॉल लॉगचा तपास करण्यात आला. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयएच्या पथकाने सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.