मांसाहार करणाऱ्यांसाठी बिर्याणी म्हणजे जणू पर्वणीच. त्यातही हैद्राबाद बिर्याणी म्हटल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणीच सुटते. हौद्राबादमधील अशाच एका लोकप्रिय बिर्याणीविक्री करणाऱ्या रेस्टॉरंटचे नाव एका आगळ्या वेगळ्या विक्रमासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. वर्षभरात सर्वाधिक प्लेट बिर्याणीची विक्री करणारे रेस्टॉरंट म्हणून हैद्राबादमधील ‘पॅरडाइज रेस्टॉरंट’चे नाव लिम्का बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे.

लिम्का बुक २०१९ मध्ये नोंदवण्यात आलेल्या विक्रमानुसार १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान पॅरडाइज रेस्टॉरंटच्या मालकीच्या ३० शाखांमधून चक्क ७० लाख ४४ हजार २८९ प्लेट बिर्याणींची विक्री करण्यात आली. म्हणजेच एका दिवसाला या रेस्टॉरंटमधून १९,३०० प्लेट बिर्याणी विकल्या गेल्या. मुंबईमध्ये आयोजित ‘एशिया फूड काँग्रेस’ कार्यक्रमामध्येही ‘पॅरडाइज’ला सर्वोत्तम बिर्याणी विकणारे रेस्टॉरंट म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. ‘पॅरडाइज फूड कोर्ट’ या कंपनीची दक्षिण भारतामध्ये ३० वेगवेगळ्या ठिकाणी आऊटलेटस् आहेत. या आऊटलेटमध्ये अनेक प्रकारची बिर्याणी मिळते. ‘पॅरडाइज फूड कोर्ट’चे अध्यक्ष अली हिमाती यांना याच कार्यक्रमामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. खाद्यपदार्थ, हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी श्रेत्रातील योगदानाबद्दल अली यांचा सन्मान करण्यात आला.

‘पॅरडाइज’च्या वेबसाईटनुसार १९५३ साली हैद्राबाद येथे सुरु केलेल्या १०० जण बसू शकतील अशा कॅफेपासून ‘पॅरडाइज फूड कोर्ट’ या कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला येथे केवळ चहा आणि इतर छोटे पदार्थ विकले जायचे. आज दक्षिणेमधील सर्व मोठ्या शहरांमध्ये ‘पॅरडाइज’ची शाखा आहे. केवळ हैद्राबादमध्येच या कंपनीच्या १७ शाखा आहेत. त्याशिवाय बेंगळुरु, विशाखापट्टनम, गुंटूर, चेन्नई, गुरुग्राम, विजयवाडा येथेही या बिर्याणी सेंटरच्या शाखा आहेत.

नुकतेच कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या गौतम गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच कंपनी दिल्लीसहीत इतर महत्वाच्या शहरांमध्ये आपल्या शाखा सुरु करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. कंपनीच्या वेबसाईटनुसार पुणे, कोकत्ता, वारंगल येथे लवकरच रेस्टॉरंट सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.