तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. तसंच त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. काही जणांकडून पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. तर काही जणांकडून याला विरोध होत आहे. अशातच या कारवाईविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

वकील सीएस मणी आणि वकील प्रदीप कुमार यांनी पोलिसांच्या या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०१४ मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं पालन या कारवाईदरम्यान करण्यात आले नसल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या कारवाईत सहभागील पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याची आवश्यकता असून संबंधित पोलिसांवर करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

तसंच या कारवाईचं समर्थन करणाऱ्यांविरोधातही सर्वोच्च न्यायालयात यातिका दाखल करण्यात आली आहे. मनोहरलाल शर्मा यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. माध्यमांवरही गॅग ऑर्डर चालवण्याची मागणी त्यांनी केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फतही याची चौकशी व्हावी, असं त्यांनी याचिकेत नमूद केलं आहे.