आंध्र प्रदेश व तेलंगण उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची सूचना

‘आई ही देवाला पर्याय आहे आणि गाय ही आईला पर्याय आहे’, असे सांगून आंध्र प्रदेश व तेलंगण उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तीनी गोहत्या हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची सूचना केली आहे. एका पशुव्यापाऱ्याने केलेली याचिका शुक्रवारी फेटाळून लावताना, बकरी ईदच्या सणाला निरोगी गाईंची कत्तल करण्याचा मुस्लिमांना मूलभूत हक्क नाही हे सांगण्यासाठी न्या. बी. शिवशंकर राव यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा हवाला दिला. बकरी ईदला निरोगी गाईंची कत्तल करणे मुस्लिमांच्या धार्मिक उद्देशासाठी आवश्यक नाही, किंवा दुसऱ्या शब्दांत, बकरी ईदला धार्मिक पुण्य मिळवण्यासाठी गाईची कत्तल केहलीच पाहिजे असे नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने या आदेशात म्हटल्याचे त्यांनी नमूद केले.

पशू-क्रूरता कायदा १९६० आणि भारतीय दंड विधानाचे कलम ४२९ यांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करावी, जेणेकरून या कायद्यांतर्गत येणारे गुन्हे अजामीनपात्र होतील, असे निर्देश न्या. राव यांनी आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारांना दिले. या निर्देशांचे पालन करण्यासाठी त्यांनी या सरकारांना ७ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

भारतात जे लोक बव्हंशी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात, त्यांच्यासाठी गाय ही आईला पर्याय आहे, जी देवाला पर्याय आहे. गाईला विशेष पावित्र्य असू तिला ‘अघन्य’ (हत्या करू नये अशी) म्हटलेले आहे. अशा रीतीने, गाय ही पवित्र राष्ट्रीय संपत्ती आहे, असे वेद, उपनिषदे व पुराण यांचा आधार देऊन न्या. राव यांनी म्हटले आहे. गाईचे दूध हे आईच्या दुधाचे गुणधर्म असलेले आहे. गाई या आपल्या आईसारख्याच आहेत, कारण ज्या वेळी आईचे दूध सुकते, तेव्हा आपले पोषण करून आपल्याला बळकट करण्यासाठी गाय तिचे दूध नि:स्वार्थपणे देते ज्याने कधी गाईचे दूध प्याले आहे, तो या पवित्र आईची हत्या करून तिला खाण्याचे समर्थन कसे करू शकतो, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

सर्व प्रकारच्या गाई पूजनीय आहेत. त्यामुळे प्रत्येकाने रात्री झोपताना व सकाळी उठताना गाईचे स्मरण केले पाहिजे, अशीही सूचना न्यायमूर्तीनी केली आहे. याचिकाकर्त्यांच्या मालकीच्या ६३ गाई व २ बैल गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त करण्यात आल्या होत्या. नलगोंडा येथील या रहिवाशाने ही जनावरे परत मागण्यासाठी याचिका केली होती.