हैदराबाद शहर हे इस्लामी दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित ठिकाण असल्याचे विधान भाजपाचे खासदार बंडारू दत्तात्रेय यांनी केले आहे. नुकतेच एनआयएने आयसिसशी संबंधित तिघांना हैदराबादमधून ताब्यात घेतले होते. यावर दत्तात्रेय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंबंधी राज्य सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


दत्तात्रेय म्हणाले, राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) हैदराबादमध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईवरुन हे सिद्ध होते की, हैदराबाद हे इस्लामी दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. हैदराबादमध्ये इस्लामी दहशतवाद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दहशतवादी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांची भरती हैदराबादमधून करण्यात आली आहे.

तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) सरकारने एमआयएमशी येथे युती केल्याने या ठिकाणी पोलिसांवरही ठोस कारवाई करताना बंधने येत आहेत. त्यामुळे याप्रकरणी योग्य कारवाई व्हावी तसेच अशा कारवायांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथक नेमावे, अशी मागणीही यावेळी खासदार बंडारू दत्तात्रेय यांनी केली.