देशभरात तिहेरी तलाकचा मुद्दा चर्चेत असतानाच तेलंगणामध्ये पतीने पत्नीला पोस्टकार्डाद्वारे तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल करत पतीला चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

हैदराबादमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हनिफ हा शो रुममध्ये सुपरव्हायजर म्हणून कामाला आहे. ९ मार्चला हनिफचा विवाह झाला होता. विवाहानंतर हानिफने पत्नीला सोबत नेले नव्हते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हानिफ पत्नीला सोडून गेला होता. माझ्यावर उपचार सुरु असल्याचे कारणही त्याने पत्नीला दिले. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीला पोस्टकार्ड पाठवले. यावर त्याने तीन वेळा ‘तलाक’ लिहीले होते. हा प्रकार बघून त्याच्या पत्नीला धक्काच बसला. शेवटी तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

हैदराबादमधील घटनेने तिहेरी तलाकचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्येच दोन महिलांना त्यांच्या पतीने व्हॉट्स अॅपवरुन तलाक दिल्याची घटना घडली होती. सोहेल आणि अकील या भावांनी एकाच वेळी त्यांच्या पत्नींना व्हॉट्स अॅपवर तलाकचा मेसेज केला. यानंतर दोघांनीही व्हॉट्स अॅपवर तिहेरी तलाकचा तलाकचे फोटोही अपलोड केला होता. तिहेरी तलाकप्रकरणी गेल्या आठवड्यातच सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केला असून, त्यासंबंधित सर्व याचिकांवर ११ मेपासून सुनावणी होणार आहे. शेवटी या पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सासू – सास-याला अटकही केली होती. तर दोघींचेही पती अमेरिकेतच आहेत.