हैदराबाद पोलिसांनी एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हैदराबादमधील सामुहिक बलात्कार आणि खून प्रकरणावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच आता पोलिसांनी अशाप्रकारे लैंगिक अत्याचार आणि छळाविरोधात मोहिमच हाती घेतल्याचे दिसत आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पिडित मुलीचे वडील चांगले मित्र आहेत. एका कौटुंबिक समारंभादरम्यान आरोपीने पिडीत मुलीचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने तिला अश्लील फोटो पाठवले. वडीलांच्या मित्राकडून आलेले हे फोटो पाहून मुलीला धक्काच बसला. तिने याबद्दल आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणात पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा म्हणजेच ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस’ अंतर्गत या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने असं का केलं, या मागे त्याचा काय उद्देश होता यासंदर्भातील तपास पोलिस करत आहेत. तर संबंधित मुलीचे समुपदेशन करुन तिला घरी पाठवण्यात आलं आहे.