(सत्येंद्र माईणकर)
हैदराबादच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाचा ९१वा वर्धापनदिन अलीकडेच साजरा झाला. येथील प्रसिद्ध उद्योजक शिरीष धोपेश्वरकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. यावेळी ग्रंथालयाचे कार्यवाह सतीश देशपांडे यांनी संस्थेची सविस्तर माहिती सांगितली. १९२२ साली जोशीवाडय़ांत काही मराठी भाषाप्रेमी मंडळींनी केलेल्या या वाचनालयाला आता स्वत:ची वास्तू मोक्याच्या ठिकाणी लाभली आहे. कै. काशिनाथराव वैद्य स्मारक हॉलमध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वाचनालयाचा दैनिकाचा विभाग वाचनासाठी खुला असतो. यात मराठी, इंग्रजी नियतकालिके वाचकांसाठी उपलब्ध असतात. अभिमानाने आवर्जून उल्लेख करण्याची बाब म्हणजे मराठी प्रांतात असलेल्या या वाचनालयात ३६,००० मराठी ग्रंथपुस्तके आहेत. कार्यवाहांनी, पूर्वीच्या कार्यकारिणींचा या प्रगतीत सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या भाषणात प्रमुख पाहुण्यांनी ग्रंथालयाच्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पूर्वी ज्या ज्या व्यक्तींनी संस्थेला या यशाच्या पायरीवर आणले त्या सर्वाना विनम्र अभिवादन केले. प्रस्तुतच्या काळात त्यांनी digitalisation  (डिजिटलायझेशन)चा उपयोग सांगितला व ही क्रिया जरूर असलेल्या पुस्तकांवर करावी असेही सूचित केले.
वर्धापनदिनाचे औचित्य साधून रंगधारा थिएटर स्ट्रीमने मनोरंजक असे मराठी दीर्घाक ‘पदवी भ्रष्टाचाराची’ सादर केले. देशाला भ्रष्टाचाराने ग्रासले असल्यामुळे हा दीर्घाक प्रेक्षकांना फारच भावला. सर्व कलाकारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारोप उपाध्यक्ष नीला माणके-तीम्माराजूच्या भाषणाने झाला. सतीश देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. चहापानानंतर ही मनोरंजक संध्याकाळ संपली.

किरण जोग यांचे युवा पिढीला मार्गदर्शन
(मुकुंद महादेव घाणेकर)
‘करियर निवड मार्गदर्शन आणि काऊन्सिलिंग’ या विषयी, किरण जोग यांचे व्याख्यान, चित्तपावन ब्राह्मण संघ बडोदे या संस्थेने आयोजित केले होते. महाराणी चिमणाबाई हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विद्यार्थी व पालकवर्गाचे, सभेचे अध्यक्ष डॉ. अविनाश पेंडसे यांनी स्वागत केले. नियोजित व्याख्याते किरण जोग यांचेही पेंडसे यांनी स्वागत केले व त्यांचा परिचय करून दिला. जोग यांनी आपले प्रगल्भ विचार, आपल्या माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वक्तव्यातून उपस्थितांसमोर मांडले. ‘पालकांनी मुलांना संगणक शिकू द्यावे, पालकांची इच्छा असल्यास स्वत:ही शिकावे, परंतु मुलांना मात्र या शिक्षणापासून परावृत्त करू नये’ असे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगितले. तर्खडकर भाषांतर पाठमाला वाचा, युवा पिढीने आपला कद, एद टेस्ट करावा, वाचन करावे, टीव्हीवरील कार्यक्रम पाहताना पथ्यपाणी पाळावे. अनावश्यक गोष्टी पाहणे टाळावे. इ. गोष्टी त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना सांगितल्या. पैसा मिळविणे हे एकच ध्येय उराशी बाळगू नये तर देशासाठी, समाजासाठी आपण काही देत आहोत का, याचाही विचार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. किरण जोग यांच्या मार्गदर्शनपर भाष्यातून गांभीर्य, तळमळ, स्पष्टवक्तेपणा, परखडपणा, विनोदी शैली, रंजकता अशा अनेक पैलूंची प्रचीती येत होती. म्हणूनच हा कार्यक्रम सर्व उपस्थितांना भावला. यानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम संपन्न झाला. अनेक विद्यार्थ्यांनी मार्मिक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना समर्पक उत्तरे जोग यांनी दिली. सदर सुसंवाद समाधानकारक तसेच खेळीमेळीचा व रंगतदार झाला. समारोप करीत असताना त्यांनी सांगितले की, कार्यक्रमानंतर, ‘आपण सर्वच जण आपापल्या घरी जाऊ, परंतु हे नातं मात्र इथे संपणार नाही, आपण केव्हाही माझ्याशी माझ्या भ्रमणध्वनीवर संवाद साधा, मी आपणासाठी उपलब्ध असेन’ असे आश्वासनही त्यांनी दिले. शेवटी प्रदीप परांजपे यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘गौरव बृहन्महाराष्ट्राचा’ नवोदित गायकांचे संगीत संमेलन
भारतीय अस्मितेची तेजस्वी शलाका म्हणजे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती. संपूर्ण देशात तसेच देशाबाहेर मराठी माणसे मराठी भाषेच्या अस्मितेसाठी झटत असतात. भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी आत्मीयता जपण्याला मर्यादा नसते. ही जपणूक करण्यासाठी सक्रिय व्यक्तीसह संगठनाचीसुद्धा तितकीच गरज असते. ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तुकाराम महाराजांच्या ओवीला सार्थ करीत ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ’ स्थानिक समाजांशी एकरूप होऊन मराठी भाषा आणि संस्कृतीची परंपरा महाराष्ट्राबाहेरील प्रांतातून फडकवीत ठेवण्याचे मौलिक कार्य करीत आहे. मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तींना आणि संस्थांना सक्रिय तसेच संगठित बनवून, आपली मायबोली आणि मराठी बाणा तसेच सांस्कृतिक वारसा अनेक प्रांतांत टिकविण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक कार्य अनेक समित्यांच्या माध्यमातून करवून घेणारे बृहन्महाराष्ट्र मंडळ राष्ट्रीय मंदिरच आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अनेक उपक्रमांपैकी, नवोदित कलावंतांना उत्तुंग रंगमंच लाभावा या दृष्टीने २०१२-१३ या वर्षी प्रादेशिक संगीत स्पर्धा संमेलन देशाच्या विविध प्रांतांतून आयोजित करण्यात आले. सर्व केंद्रांवर संयोजक दिलीप कुंभोजकर यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याच्या दृष्टीने विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेची अंतिम फेरी उज्जयिनी येथे संपन्न झाली.

बरोडा अ‍ॅमॅच्युअर्स क्लबचा उपक्रम
(मुकुंद महादेव घाणेकर)
गेल्या अनेक वर्षांची नाटय़कला सादर करण्याची परंपरा जपत, बरोडा अ‍ॅमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक क्लब या संस्थेने, ‘हे बंध रेशमाचे’ या संगीत नाटकाचा प्रयोग महात्मा गांधी नगरगृह बडोदे येथे सादर केला. डॉ. रविकांत जोशी यांचे दिग्दर्शन सदर नाटकास लाभले. प्रकाशयोजना रविकांत जोशी, वेशभूषा रंगभूषा अरुणा जोशी, रंगमंच व्यवस्था पराग कर्वे यांची होती. पंडितजी आणि खांसाहेब यांच्या भूमिका अनुक्रमे उदय दडपे व अतुल जोशी यांनी प्रभावीपणे सादर केल्या. सुखदा दांडेकर यांनी रेशमाची व्यक्तिरेखा उत्तम प्रकारे साकारली.
कै. रणजितसिंहजी गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना आदरांजली म्हणून हा संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.