हैदराबादमध्ये पोलिसांनी एका ख्यातनाम कंपनीत कामाला असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणी आणि तिच्या पाच साथीदारांना अपहरण व हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. तरुणीने २३ वर्षांच्या तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप असून हा तरुण तिचा पाठलाग करत होता, तसेच तिची छेड काढत होता. त्याला धडा शिकवण्यासाठी तरुणीने अपहरण व हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

हैदराबादमध्ये राहणारी २४ वर्षांची दिव्या (नाव बदलले आहे) ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. परिसरात सुतारकाम  करणाऱ्या व्ही. साईकुमार या तरुणाने तिला काही महिन्यांपूर्वी पाहिले होते. साईकुमारचे दिव्यावर एकतर्फी प्रेम होते. तो दिव्याचा पाठलाग करायचा. तसेच तिला फोन करुन त्रासही द्यायचा.

साईकुमार एका तरुणीच्या घरात सुतारकामासाठी गेला होता, तिच्या घरीच त्याने पहिल्यांदा दिव्याला पाहिले होते. त्या तरुणीचा मोबाईल बंद पडल्याने तिने दिव्याच्या मोबाइलवरुन साईकुमारला फोन केला होता. त्यामुळे साईकुमारकडे दिव्याचा मोबाइल क्रमांकही होता.  तो दिव्याला फोन करुन भेटायला बोलवायचा. साईकुमारच्या त्रासाला दिव्या कंटाळली होती. तिने पाच जणांचा मदतीने साईकुमारच्या अपहरणाचा कट रचला.

दिव्याने आधी मित्राच्या मदतीने आणखी चार जणांना कटात सामील करुन घेतले. या दोघांनी दोन चालक, एक सुरक्षा रक्षक, गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाच्या मदतीने साईकुमारचे अपहरण केले. दिव्याने साईकुमारला हैदराबादमधील निर्जनस्थळी भेटायला बोलावले. साईकुमार तिथे पोहोचताच पाचही जणांनी त्याच्यावर हल्ला केला. साईकुमारला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली आणि त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. दोन दिवसांनी साईकुमार तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला आणि त्याने थेट पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी शुक्रवारी दिव्या व तिच्या पाचही साथीदारांना अटक केली आहे. अपहरण व हत्येचा प्रयत्न अशा कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. छेडछाड किंवा पाठलाग करुन त्रास दिल्याचा प्रकार घडल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, मुलींनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.