नियम हे मोडण्यासाठीच असतात असं अनेकजण उपहासाने म्हणताना आपण पाहत असतो. पण तसं पहायला गेलं तर आपल्या देशात अनेकजण ही गोष्ट जरा जास्तच गांभीर्याने घेताना दिसत असतात. खासकरुन वाहतुकीच्या बाबतीत तर सर्रासपणे नियमांना धाब्यावर बसवलं जातं. ज्याप्रमाणे झेब्रा क्रॉसिंग हे लोकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी असतानाही अनेक वाहनं तिथे उभी असतात. सिग्नल संपण्यासाठी पाच सेकंद असतानाच गाड्या धावू लागतात. बॅटरी वाचवण्यासाठी तर अनेकजण इंडिकेटरही देत नाहीत. असाच एक पट्ठ्या आपण हेल्मेट घालणार नाही असं आपल्या बाइकवरच लिहून प्रवास करत होता. हैदराबाद पोलिसांनी मात्र त्याला भन्नाट उत्तर दिलं आहे.

हैदराबाद वाहतूक पोलिसांनी कृष्णा रेड्डी हा तरुण विनाहेल्मेट प्रवास करत असल्याचा फोटो पाहिला. विशेष म्हणजे त्याने आपल्या बाइकवर ‘नो हेल्मेट…एका खऱ्या पुरुषाप्रमाणे मरेन’ असं लिहून त्याने थेट पोलिसांनाच आव्हान दिलं होतं. हैदराबाद पोलिसांनीही ट्विटरच्या माध्यमातून भन्नाट उत्तर देत त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

‘कृष्णा रेड्डी आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला मरु देणार नाही. तुम्ही जगाल याची आम्ही खात्री घेऊ. कृपया हेल्मेट घालून बाइक चालवा’, असं ट्विट हैदराबाद पोलिसांनी केलं आहे.

शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वार हेल्मेट न घालता दुचाकी पळवत असतात. कृष्णा रेड्डी याने मुर्खपणा असा केला की, नंबर प्लेटच्या वरतीच हेल्मेट घालणार नाही असं लिहिलं होतं. नंबर प्लेट दिसल्याने पोलिसांना त्याची माहिती मिळवणं सोपं झालं. पोलिसांनी त्याचा पूर्ण रेकॉर्ड काढला आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त सी पी रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बाइकच्या मालकाविरोधात १० चलान प्रलंबित आहेत. सात चलान तर हेल्मेट न घातल्यामुळे आहेत. लोकांनी आमच्या सुचनांकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही मजेशीरपणे उत्तर देत आहोत. आम्ही मैत्रीपुर्ण आणि मजेशीर मेसेज पाठवल्यानंतर लोकांचा जास्त प्रतिसाद मिळतो’.