लोकांना समानतेची शिकवण देण्यासाठी हैदराबादच्या श्री रंगनाथ मंदिराच्या पुजाऱ्याने जे केलं ते सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. पुजारी सीएस रंगराजन यांनी दलित भक्त आदित्य पारासरी याला आपल्या खांद्यावर उचलून घेत मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन घडवून दिलं. पुजारी रंगराजन यांनी उचललेल्या या पावलाचं सर्वजण कौतुक करत आहेत. ही सोमवारची घटना आहे, जेव्हा मंदिरात देवाच्या नावाचा उच्चार, फुलांची सजावट, मंत्र म्हटले जात होते, तेव्हा रंगराजन २५ वर्षीय दलित तरुण आदित्यला आपल्या खांद्यावर घेऊन मंदिरात पोहोचले. इतकंच नाही तर गाभाऱ्यात नेऊन दर्शनही दिलं.

‘ही २७०० वर्षांपुर्वीच्या एका घटनेची पुनरावृत्ती आहे. याला मुनी वाहन सेवा या नावाने ओळखलं जातं. ही परंपरा सनातन धर्माचा खरा संदेश पोहोचवण्यासाठी आणि समाजात समानतेची शिकवण देण्यासाठी पाळली जाते’, अशी माहिती रंगराजन यांनी दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘सध्याच्या काळात अनेक लोक आपल्या स्वार्थासाठी देशाचं वातावरण बिघडवत आहेत’. दलित तरुणाला खांद्यावर उचलून घेण्याचं कुठून सुचलं असं विचारलं असता त्यांनी माहिती दिली की, ‘जानेवारी महिन्यात उस्मानिया महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. यावेळी कशाप्रकारे मागासलेल्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही यावर चर्चा झाली. त्यानंतर मी हा निर्णय घेतला’.

मंदिरातील हे दृश्य पाहिल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्वांनी मोठ्या उत्साहात मंदिरात स्वागत केलं. यावेळी राज्यातील अनेक देवस्थानांचे पुजारी आणि तेलंगणा सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.