तेलंगणची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. अधिक तपासासाठी त्यांना घटनास्थळी आणल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. तसंच त्यांनी पोलिसांच्या बंदुकाही हिसकावून घेतल्या होत्या. त्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती. या घटनेचे काही स्तरातून स्वागत तर काही स्तरातून विरोध करण्यात आला होता. परंतु आता याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या घटनेत ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार नाहीत.

दरम्यान, या घटनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये न्यायिक हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने या आरोपींचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. शुक्रवारी पोलीस आणि आरोपींच्या झालेल्या चकमकीत हे चारही जण ठार झाले होते. यापूर्वी अटकेत असलेल्या या आरोपींना न्यायालयानं ७ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. पोलीस कोठडीत असताना आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले होते.

आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत बंदूक खेचून घेतली आणि फायरिंग करण्यास सुरुवात केल्याने स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली होती. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. “मोठा तपास केल्यानंतर आम्ही चार आरोपींना अटक केली होती. ३० तारखेला त्यांना अटक करण्यात आली. ४ तारखेला आम्हाला आरोपींची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही गुन्हा कसा केला याची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी पीडितेचा मोबाइल आणि इतर गोष्टी घटनास्खळी लपवल्या असल्याचं सांगितलं. आरोपींना घेऊन पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. त्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला असता चौघांचा मृत्यू झाला,” अशी माहिती सज्जनार यांनी शुक्रवारी दिली होती.

काय आहे प्रकरण ?
तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते
२७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला. यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

ट्रकमधून नेला होता मृतदेह
तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला होता. पोलिसांनी सांगितलं होतं की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.