News Flash

#HyderabadHorror: आरोपींनी तोंड दाबून ठेवल्याने मदतही मागू शकली नाही तरुणी, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे

तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला असून, पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती.

सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी एका आरोपीने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

चार आरोपींना अटक
तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

सीसीटीव्ही आणि लोकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हा सर्व प्रकार व्यवस्थित कट रचून करण्यात आला असल्याचं सायबरादाबादचे पोलीस आयुक्त वीसी सज्जनर यांनी सांगितलं आहे. बुधवारी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं.

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले
यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला.

यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हैदराबादमधील या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. ही निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. सोशल मीडियापासून ते सगळीकडेच याप्रकरणी आवाज उठवण्यात येत असून आरोपींना कडक शिक्षा केली जावी अशी मागणी होत आहे. पीडित महिलेच्या आईने सर्व आरोपींना जिवंत जाळून टाका अशी मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच मदत केली असती तर मुलीला वाचवता आलं असतं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 11:09 am

Web Title: hyderabad telangana gangrape and murder nirbhaya sgy 87
Next Stories
1 गोव्यात राजकीय भूकंप करायला निघालेल्या राऊतांना काँग्रेसचा दणका, म्हणाले…
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 गांधी परिवाराला धोका कमी झाला हे नक्की कोणाला वाटतं ?; शिवसेनेचा सवाल
Just Now!
X