‘तेलंगणा राष्ट्र समिती’ या पक्षाच्या हैदराबादमधील नगरसेवकाच्या मुलाला मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली. दोन महिलांना अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक गौडला अटक केली आहे. अभिषेक गौडने आणखी एका महिलेला त्रास दिला होता. मात्र, या महिलेने अद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली नाही.

हैदराबाद पोलिसांकडे दोन महिलांनी अभिषेक गौडविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिषेक आणि त्याच्या दोन मित्रांनी फेसबुकद्वारे या महिलांशी संपर्क साधला. यानंतर त्यांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी व्हॉट्स अॅपवर बोलायला सुरुवात केली. गौड आणि त्याचे मित्र पीडित महिलांवर व्हिडीओ कॉलसाठी दबाव टाकत होते. तसेच प्रत्यक्षात भेटण्याचा तगादाही लावला. मात्र, पीडित महिलांनी नकार दिल्यावर गौडने त्यांना धमकी दिली. इंटरनेटवर मॉर्फ केलेले अश्लील फोटो अपलोड करुन बदनामी करु, अशी धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आयटी अॅक्ट, विनयभंग या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक गौडने फेसबुकवर दोन फेक प्रोफाईल तयार केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. अभिषेक गौडच्या दोन्ही मित्रांचा अजून शोध सुरु आहे.

तेलंगण राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या मुलांचे प्रताप यापूर्वीही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी नगरसेवक व्यंकटेश गौड यांच्या मुलाने स्थानिकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आला होता. पार्किंगमधून कार काढायला सांगितल्याच्या रागातून त्याने स्थानिकांना मारहाण केली होती. ऑगस्टमध्ये रेड्डीनगरमधील तेलंगण राष्ट्र समितीचे नगरसेवक लक्ष्मी प्रसन्न यांचा मुलगा मनिष गौंड याने टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आणखी एका नेत्याच्या मुलाला अटक झाल्याने पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे.