अमेरिकेत नोकरी करणा-या दोन भावांनी हैदराबादमध्ये राहणा-या त्यांच्या पत्नींना व्हॉट्स अॅपवर घटस्फोट दिल्याची घटना समोर आली आहे. तलाक दिल्यावर सासरच्या मंडळींनी त्या दोघींनाही घराबाहेर काढले आहे. आता या पीडित महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सासू – सास-याला अटकही केली आहे.

हैदराबादमध्ये राहणारे अब्दूल सोहेल आणि अब्दूल अकील हे दोन तरुण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत नोकरीसाठी गेले होते. मात्र पाच दिवसांपूर्वी सोहेल आणि अकील या भावांनी एकाच वेळी त्यांच्या पत्नींना व्हॉट्स अॅपवर तलाकचा मेसेज केला. यानंतर दोघांनीही व्हॉट्स अॅपवर त्रिवार तलाकचे फोटोही अपलोड केला. हा प्रकार बघून दोघांच्या पत्नींना धक्काच बसला. अब्दूल सोहेलचे २०१२ मध्ये हिना फातिमाशी लग्न झाले होते. तर अब्दूल अकीलने २०१५ मध्ये मेहरन नूरशी लग्न केले होते. सोहेल आणि फातिमाला दोन मुले तर अकील आणि नूरला एक मुलगा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दोघेही त्यांच्या पत्नींना तलाकचे मेसेज पाठवत होते. पण सुरुवातीला दोघींनीही त्याकडे दुर्लक्ष केले.

‘पाच दिवसांपूर्वी माझ्या पतीने मला तीन वेळा तलाकचा मेसेज पाठवला. माझ्या जावेलादेखील तिच्या पतीने तलाकचा मेसेज पाठवला. एकाच वेळी दोघींना तलाक दिल्याने आम्हाला धक्काच बसला. त्यांना घटस्फोट हवा होता तर तो कायदेशीर मार्गाने घ्यायला हवा होता’ असे हिना फातिमा यांनी सांगितले. दोघींनी या प्रकाराची माहिती सासू सास-यांना सांगितले. त्यांनी मदत करण्याऐवजी दोन्ही सूनांना घरातून बाहेर काढले. शेवटी बेघर झालेल्या दोघींनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हैदराबाद पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या सासू – सास-यांना अटक केली आहे.