हैदराबाद विद्यापीठातील दलित प्राध्यापकाचा राजीनामा
हैदराबाद विद्यापीठाच्या प्रो कुलगुरुपदी प्रा.विपीन श्रीवास्तव यांची नेमणूक केल्याच्या निषेधार्थ दलित प्राध्यापकाने राजीनामा दिला आहे. विद्यापीठात दलित प्राध्यापकांसाठी चांगले वातावरण उरलेले नाही असा आरोप या प्राध्यापकाने केला आहे.
कुलसचिवांना पाठवलेल्या पत्रात सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल एक्स्लुजन अँड इन्क्लुजिव्ह पॉलिसी या विभागाचे प्रमुख प्रा. श्रीपती रामुडू यांनी म्हटले आहे, की दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने १७ जानेवारीला आत्महत्या केली होती. त्यानंतर देशव्यापी निषेध आंदोलन झाले. त्यापूर्वी व नंतर विद्यापीठातील वातावरण आणखी बिघडत गेले आहे. दलितांना लक्ष्य केले जात असून त्यांचा आत्मविश्वास खच्ची होत आहे, प्रशासन निष्पक्ष राहिलेले नाही. अनुसूचित जाती जमाती मंचाच्या माध्यमातून अनेक पत्रे लिहिली गेली, त्यात दलित प्राध्यापकांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्यातून प्रशासन या प्राध्यापकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करील असे वाटले होते पण तसे घडले नाही उलट प्रा. विपीन श्रीवास्तव यांची प्रकुलगुरुपदी नेमणूक करण्याचे परिपत्रक काढण्यात आले.
श्रीवास्तव यांनी यावर प्रतिक्रि या देताना सांगितले, की रामुडू यांनी प्रशासकीय बाबीत सहकार्य केले नसून ते कामावरही येत नाहीत. जानेवारीपासून त्यांनी कुठल्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत व प्रशासकीय कामात सहकार्य केलेले नाही. एका विद्यार्थ्यांला शैक्षणिक परिषदेसाठी जायचे होते पण त्याच्या कागदपत्रांवर रामुडू यांनी सह्य़ा केल्या नाहीत, मग अधिष्ठाता व मी कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. रामुडू यांनी औपचारिक राजीनामा दिलेला नाही किंबहुना त्याबाबत आपल्याला माहिती नाही कारण मी आज रजेवर आहे. वृत्तपत्रांतूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे समजले. त्यांनी राजीनामा दिला का, हे विद्यापीठ अधिकाऱ्यांना विचारल्यानंतरच कळेल. रामुडू यांनी श्रीवास्तव यांच्यावर पूर्वी फार गंभीर आरोप असल्याचे म्हटले आहे. वेमुलासह पाच दलित विद्यार्थ्यांना शिक्षा सुनावणाऱ्या समितीचे श्रीवास्तव हे अध्यक्ष होते.
श्रीवास्तव यांची ७ जून रोजी प्रकुलगुरुपदी नेमणूक करण्यात आली असून ते कुलगुरू प्रा. अप्पाराव पोडिले यांना मदत करणार आहेत.