अमेरिकेला जाण्याआधी हैदराबादमध्ये तिला सगळे मुन्नी म्हणून ओळखायचे. आज याच हैदराबादच्या मुन्नीने म्हणजे गझला हाश्मी यांनी व्हर्जिनियाच्या सिनेटरपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. गझला हाश्मी गेल्या ५० वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. व्हर्जिनियाच्या सिनेटर बनणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन मुस्लिम आहेत. अमेरिकेच्या राजकारणात मुस्लिम महिलांचे प्रतिनिधीत्व वाढत असताना गझला हाश्मी यांनी ही निवडणूक जिंकली आहे. मागच्यावर्षी इल्हान उमर आणि राशिदा तलैब या दोन मुस्लिम महिलांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

व्हर्जिनियामध्ये भारतीय, हिस्पॅनिक्स आणि कोरियन लोकांची मोठी संख्या आहे. इमिग्रेशन हा तिथे एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्ण वेळ राजकारणात उतरण्यासाठी त्यांनी अलीकडेच आपली नोकरी सोडली. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य केले आहे.

दुबईमध्ये राहणाऱ्या झफर अकबर यांनी गझला हाश्मी यांचे अभिनंदन केले आहे. लहानपणीपासून मी मुन्नीला ओळखतो असे ते म्हणाले. झफर अकबर सुद्धा हैदराबादचे आहेत. या विजयावर बोलताना गझला हाश्मी यांनी हा माझा एकटीचा विजय नाही. व्हर्जिनियामध्ये आपण बदल घडवू शकतो असे ज्यांना वाटते त्या सर्वांचा हा विजय आहे असे त्या म्हणाल्या. गझला यांनी जॉर्जिया विद्यापीठातून इंग्लिशमध्ये बीएची पदवी घेतली. हाश्मी यांचे पती अझर १९९१ साली रिचमाँड येथे स्थायिक झाले.