CBSE पेपर लीक प्रकरण अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणामुळे माझीही झोप उडाली मीदेखील एक पालक आहे मी या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या पालकांचे दुःख समजू शकतो असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.  या पेपर लीक प्रकरणामुळे देशातील परीक्षा व्यवस्थेतील घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

सीबीएसईचा पेपर लीक झाल्याने १० वीचा गणिताचा पेपर आणि १२ वीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा एकदा घेतला जाणार आहे. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. पेपर लीक प्रकरणाबाबत प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी पेपर लीक प्रकरणावरून टीका केली.

या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांना कठोरातले कठोर शासन केले जाईल. त्यांना लवकरात लवकर शोधण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत असेही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. एसएससी पेपर लीक प्रकरणात ज्याप्रमाणे पोलिसांनी आरोपींना पकडले आहे तसेच याही प्रकरणातले दोषी पकडले जातील असेही जावडेकर यांनी म्हटले आहे. तसेच परीक्षेची यंत्रणा सुधारावी आणि पेपरफुटी होऊ नये म्हणून अधिक काळजी देण्यावर आम्ही भर देतो आहोत. या प्रकरणी बुधवारी ८ ठिकाणी छापे मारण्यात आलेत.

पेपर लीकच्या प्रकरणातनंतर एक विशेष तपास पथक स्थापण्यात आले आहे. या पथकाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. पोलिसांना पेपर लीक प्रकरणात कोचिंग क्लासेसवर संशय आहे. गुरुवारी दुपारीही द्वारका, रोहिणी, राजेंद्र नगर या भागातील कोचिंग क्लासेसवर छापे मारण्यात आले असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या सगळ्या प्रकरणी दिल्लीत विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरु केली आहेत. परीक्षा घ्यायची असेल तर सगळ्याच विषयांची परीक्षा पुन्हा घ्या. फक्त एक किंवा दोन विषयांची नाही अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच परीक्षेसंदर्भात मुलांवर मानसिक दबाव असतो सगळी मुले पूर्ण तयारीनिशी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात अशात अशा काही घटना घडल्या तर त्यांचा तणाव वाढतो त्यामुळे परीक्षा घ्यायची असेल तर सगळ्या विषयांचीच घेतली पाहिजे ही त्यांची मागणी योग्यच आहे असे मत काही पालकांनीही नोंदवले आहे. पेपर लीक प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यापैकी एकालाही सोडणार नाही असे सीबीएससी बोर्डाने म्हटले आहे. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून लीक प्रुफ प्रणाली विकसित केली जाईल असेही जावडेकर यांनी म्हटले आहे.