काश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) आगपाखड केली आहे. आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असे विधानही त्यांनी केले आहे. मोदी सरकारने संविधानातील ३७० कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष वेढण्याचा हरऐक प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे.

इम्रान खान यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय कारण नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये संचारबंदीची स्थिती आहे. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिमांचे दमन होईल आणि शेवटी पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल. हा प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदू आवृत्ती आहे. काश्मीरची डेमोग्राफी बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जात आहे. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही जग आज गप्प आहे.

दरम्यान, इम्रान खान यांच्या या टिप्पणीवर भाजपा नेते राम माधव यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले की, इम्रान खान यांच्या या वक्तव्यावरुन हे स्पष्ट होते की, जगभरात दहशतवाद पसरवणारा पाकिस्तान किती सैरभर झाला आहे. जगाला पाकपुरस्कृत दहशतवादाचा धोका आहे मात्र, भारतापासून कोणताही धोका नाही. आम्ही मोहम्मद अली जिना यांच्या दोन राष्ट्र आणि शेख अब्दुल्ला यांच्या तीन राष्ट्राचा सिद्धांत संपवला आहे. इम्रान खान पाकिस्तानातील धार्मिक दहशतवाद संपवतील का? असा सवालही यावेळी माधव यांनी केला.