मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान असतील, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) माणूस असून देशसेवा हे माझे कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तुम्ही आहात काय असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०१९’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीसह विविध विषयांवर खुलेपणाने आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारने शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शेती आणि ऊर्जा क्षेत्रात विविधीकरण करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले.

ते म्हणाले, नमामि गंगा या अभियानामुळे गंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. हे मोदी सरकारच्या काळातच झाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. मोदी सरकारच्या काळात रस्त्यांची कामे वेगाने आणि मोठ्याप्रमाणात झाली आहेत. देशात रोजगार निर्मितीला पोषक वातावरण आहे. पण मला वाटते की लोकांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्या इतपत सक्षम झाले पाहिजे.

काँग्रेस पक्षाविषयी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसचे नेते माझे शत्रू नाहीत. आमची राजकीय विचारधारा वेगळी असली तरी त्या पक्षात माझे चांगले मित्र आहेत. विरोधी पक्षांमध्येही माझे अनेकजण चांगले मित्र असल्याचे ते म्हणाले.