मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांना धमकावणाऱ्या बीएसपी आमदार रमाबाई यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मागणी करुनही मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्या रमाबाई यांनी आपलं स्थान सर्व मंत्र्यांच्या वर आहे. कारण राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यात आपण किंगमेकरची भूमिका निभावली होती असं म्हटलं आहे. मी सगळ्या मंत्र्यांची बाप आहे, कारण आम्हीच सरकार स्थापन केलं आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

रमाबाई पाथरिया विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. आपल्याला मंत्रीपद देण्यात आलं नाही तरी चांगलं काम करणं सुरु ठेवू असं त्यांनी सांगितलं आहे. ‘आम्ही जर मंत्री झालो तर चांगलं काम करु…नाही झालं तरी करु. आम्ही सगळ्या मंत्र्यांचे बाप आहोत, आम्हीच सरकार तयार केलं आहे’, असं रमाबाई यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी रमाबाई यांनी कलमनाथ सरकारकडे मंत्रीपद देण्याची मागणी केली होती. राज्यात कर्नाटकसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने सर्व मंत्र्यांना आनंदी ठेवलं पाहिजे असं रमाबाई यांनी म्हटलं होतं. मध्य प्रदेशात बीएसपीचे दोन आमदार असून सरकार गठीत करताना मंत्रीपद देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण असं काही झालं नाही. काँग्रेसने लवकर आपलं आश्वासन पूर्ण करावं अन्यथा कर्नाटकसारखी परिस्थिती उद्भवेल असा इशारा रमाबाई यांनी दिला आहे.