दिल्लीमध्ये २ नोव्हेंबर रोजी खाकी वर्दीविरोधात काळे कोट अर्थात पोलिसांविरोधात वकील असा संघर्ष पहायला मिळाला. त्यानंतर काही दिवसांनी येथील दरियागंज परिसरामध्ये पोलिस नाकाबंदी करुन दुचाकी वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एक धक्कादायक अनुभव आला. एका तरुणाला हेल्मेट न घालताना दुचाकी चालवत असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी अडवले. त्यावेळी या तरुणाला हे अपमानकारक वाटले. ‘माझा भाऊ वकील आहे,’ असं त्याने धमकीवजा आवाजात पोलिसांना सांगितलं.

तीस हजारी कोर्ट परिसरामध्ये वकील आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाल्याची आठवणही या तरुणाने पोलिसांना करुन दिली. या वक्तव्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी या तरुणाची गाडी जप्त केली आणि त्याने केलेली सर्व वक्तव्य दंडाच्या पवतीवर नमूद करत त्याला तीस हजारी कोर्टात पाठवले.

संबंधित घटना १३ नोव्हेंबर रोजी घडल्याचे समजते. दारियागंज येथे पोलिसांना नाकाबंदी केलेली असताना एक तरुण हेल्मेट न घालताना जात असल्याचे त्याला पोलिसांनी अडवून चौकशी केली. या तरुणाकडे गाडीची कागदपत्रेही नव्हती. पोलिसांनी चौकशी केली असताना हा तरुण संतापला आणि तो अश्लील भाषेमध्ये पोलिसांवर ओरडू लागला. ‘माझा भाऊ वकील आहे. त्याने तुम्हाला (दिल्ली पोलिसांना) मारहाण केली होती. मी तुम्हा सर्वांना बघून घेईन,’ अशी धमकीच या तरुणाने पोलिसांना दिल्याचे पोलिसांनी नोंदवलेल्या घटनाक्रमामध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांशी मर्यादा सोडून बोलल्याची नोंद करुन ही तक्रार त्यांनी थेट तीस हजारी कोर्टाकडे पाठवली आहे.

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, कागदपत्र नसणे या कारणासाठी दंड करण्याबरोबर हुज्जत घातल्यामुळे पोलिसांनी त्याची दुचाकीही जप्त केली आहे. ही दुचाकी सोडवण्यासाठी आता या तरुणाला तीस हजारी कोर्टामध्ये जिल्हा दंडाधिकारी पंकज अरोडासमोर हजर रहावे लागणार आहे.

नक्की काय घडलं पोलिस आणि वकीलांमध्ये

२ नोव्हेंबर रोजी तीस हजारी कोर्टात पार्किंगच्या कारणावरुन पोलिस आणि वकीलांमध्ये वाद सुरु झाला. एका वकिलाने लॉकअप व्हॅनसमोर कार उभी केली होती. पोलिसांनी वकिलाला असे करु नका असे म्हटलं त्यामधून बाचाबाची सुरु झाली. नंतर वकीलांनी एकत्र येऊन पोलिसांना मारहाण केली. पोलिसांनी राड्यादरम्यान गोळीबार केला आणि त्यात एका वकिलाचा मृत्यू झाला अशीही अफवा पसरली. ज्यामुळे एका छोट्या कारणावरुन सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला. त्यानंतर वकिलांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. तर पोलिसांनी जे वकील या राड्यात होते त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती.