दिल्लीतील नोएडा भागात एका ९ वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. मी मूर्ख आहे, अपयशी आहे असे या मुलीच्या वहीत तिने लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रचंड तणावाखाली असल्याने या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीच्या शाळेतले दोन शिक्षक तिचे लैंगिक शोषण करत होते अशी माहिती समोर आली आहे. वार्षिक परीक्षेत या मुलीला जाणीवपूर्वक नापास करण्यात आले होते असाही आरोप होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नापास झाल्यानंतर या मुलीमध्ये नैराश्य बळावले. तिने प्रचंड तणावाखाली येत आत्महत्या केली. मी माझा तिरस्कार करते असेही या मुलीने तिच्या वहीत लिहिले होते. या वहीत असलेले अक्षर आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचेच आहे अशी माहिती तिच्या घरातल्या सदस्यांनी दिली. माझ्या मुलीने दोन शिक्षक तिचे लैंगिक शोषण करत आहेत अशी तक्रार केली होती त्यानंतर तिला नापास करण्यात आले असा आरोप या मुलीच्या वडिलांनी केला आहे.

समाजशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता त्यामुळे मी खूप घाबरून गेले होते असे माझ्या मुलीने मला सांगितले. तसेच शिक्षकांनी मला जाणीवपूर्वक नापास केले असेही मला माझ्या मुलीने सांगितल्याचे वडिलांनी सांगितले. या प्रकरणी आता नोएडा पोलीस पुढील तपास करत आहेत. या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या दोन शिक्षकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आम्ही करत आहोत अशी माहिती पोलीस निरीक्षक अरूण के सिंग यांनी दिली. ‘इंडिया डॉट कॉम’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान ही मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेच्या शिक्षकांनी शिक्षकांवर झालेले आरोप फेटाळले आहेत. एक महिला शिक्षिका एखाद्या मुलीचे लैंगिक शोषण किंवा छळ कसा काय करू शकते असा प्रश्न मुख्याध्यापकांनी विचारला आहे. तसेच दुसरे शिक्षक या ठिकाणी मागील २५ वर्षांपासून काम करतात त्यांच्याबाबत या आधी कोणीही अशाप्रकारे तक्रार केलेली नाही असेही या मुख्याध्यापकांनी म्हटले आहे. या मुलीने आत्महत्या केली त्याचे आम्हाला दुःख झाले आहे. या मुलीच्या कुटुंबीयांच्या दुःखातही आम्ही सहभागी आहोत. ती मुलगी अभ्यासात कच्ची होती पण ती नृत्य चांगले करत होती. तिच्या त्या कलागुणांना आणखी वाव मिळायला हवा होता तिने असे पाऊल उचलायला नको होते असेही मुख्याध्यापकांनी म्हटले आहे. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am dumb i am failure class 9 girl who committed suicide wrote in her notebook
First published on: 23-03-2018 at 19:06 IST