आपल्या आडमुठय़ा धोरणांमुळे वादग्रस्त राहिलेले आणि कुणाचीही आज्ञा न मानता हितसंबंधांची भाषा बोलून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद न सोडणारे एन. श्रीनिवासन यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सुतोवाच केले आहे. चेन्नईमध्ये २९ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक निवडणूक होणार असून, श्रीनिवासन पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी उत्सुक आहेत.
‘‘मी पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी उभा राहणार आहे. तुम्ही प्रसारमाध्यमे, माझ्या बाजूने किती आणि विरोधात किती हे आकडे फक्त देत आहात,’’ असे बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी मंडळाच्या विपणन (मार्केटिंग) समितीच्या बैठकीनंतर सांगितले.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन उत्सुक असून, यापूर्वी दोन वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. यंदाच्या आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे व्यवस्थापकीय सदस्य जावई गुरुनाथ मयप्पन याचे नाव आल्याने श्रीनिवासन यांच्यावर दडपण वाढले होते. बीसीसीआयच्या बैठकीमध्ये श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला असला, तरी कामकाजासाठी जगमोहन दालमिया यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे झालेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी आयपीएलमधील दोषी खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
काही दिवसांपूर्वी चेन्नईत झालेल्या दक्षिण विभागाच्या संघटकांच्या विशेष बैठकीमध्ये काही संघटनांनी सहभाग न घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत विचारल्यावर श्रीनिवासन म्हणाले की, ‘‘पहिली गोष्ट म्हणजे प्रसिद्ध झालेले वृत्त हे चुकीचे आहे. ही प्रसारमाध्यमे जिथे बैठक झाली असे म्हणत आहे, तेच मुळात चुकीचे असून त्या स्थळावर बैठक झालेलीच नाही.’’
मंडळाच्या नियमांनुसार अध्यक्षपदाची व्यक्ती सुचवण्याची पाळी दक्षिण विभागाची आहे. पण दक्षिण विभाग आपल्या विभागाबाहेरच्या व्यक्तीचेही नाव अध्यक्षपदासाठी सुचवू शकतो. श्रीनिवासन यांच्याआधी अध्यक्षपद भूषवणारे नागपूरचे शशांक मनोहर यंदाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपद  मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे वृत्त आहे. पण बीसीसीआयच्या सूत्रांनुसार मनोहर यांना जिंकण्याची फार कमी संधी आहे.
‘‘शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी उत्सुकता दाखवली असली, तरी त्यांना पाठिंबा फक्त दक्षिण विभागाकडून थोडा पाठिंबा मिळू शकतो, पण या बळावर निवडणूक जिंकता येऊ शकत नाही,’’ असे बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.
अन्य एका बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर निवडून येतील, असा विश्वास त्यांच्या पाठिराख्यांना आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पाठिराख्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळेच श्रीनिवासन यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये चांगली मते पडतील.