कर्नाटकात भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळे आणि त्यांच्या घामामुळेच कमळ फुलले अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. इतकेच नाही तर त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत. कर्नाटकात भाजपाची वाटचाल अत्यंत उत्तम अशी होती. कर्नाटकातला भाजपाचा विजय असामान्य आणि अभूतपूर्व आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एकीकडे कर्नाटकच्या विजयाचा आनंद होत असतानाच वाराणसीत झालेल्या पूल अपघाताबद्दलही त्यांनी आपल्या भाषणात दुःख व्यक्त केले. जे लोक या अपघातात मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

कर्नाटकचे निकाल समोर आल्याने राजकारणाला विकृत स्वरुप देणाऱ्यांना चपराक बसली आहे. भाजपावर हिंदी भाषिक पक्ष असा शिक्का बसला होता. मात्र आज तुम्हाला मी विचारू इच्छितो कर्नाटकात कोण हिंदी भाषिक आहे? गुजरात हिंदी भाषिक नाही, महाराष्ट्र हिंदी भाषिक राज्य नाही, आसाम, गोवा किंवा उत्तर पूर्वेतील राज्येही हिंदी भाषिक नाहीत. तरीही आमच्याविरोधात एक पक्ष जाणीवपूर्वक अपप्रचार करतो. मात्र त्या पक्षाला जनतेनेच उत्तर दिले आहे. फक्त उत्तरच नाही तर सणसणीत चपराकच दिली आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

काँग्रेससाठी कर्नाटकचा निकाल म्हणजे जनतेने दिलेला एक झटकाच आहे. भारतातील प्रत्येक राज्यात वास्तव्य करणाऱ्या माणसांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्या अडचणीतून वाट काढून देण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे. भाजपाने कायम फक्त आणि फक्त जनहिताचाच विचार केला आहे. या आधी या देशात ज्या पक्षाची सत्ता होती त्यांना विकास या शब्दाचीच अॅलर्जी होती. २०१४ नंतर हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसकडे देशाची सत्ता अनेक वर्षे होती. या पक्षाने देशात चांगले नेतेही निर्माण केले. मात्र असा पक्ष फक्त मतांच्या राजकारणासाठी हीन पातळी गाठतो हे दुर्दैवी आहे. लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करणे, लोकांच्या भावना भडकवणे हे काम काँग्रेसने या निवडणुकांदरम्यान केले असा आरोपही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्र आणि राज्यांमध्ये तणाव निर्माण कसा होईल हे देखील काँग्रेसने पाहिले. काँग्रेसचे हे असले धोरण हा चिंतेचा विषय आहे. मात्र असे सगळे वातावरण निर्माण झालेले असताना देशातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्नाटक सहीत सगळ्या देशाचा विकास करायचा आहे हे आम्हा प्रत्येकाचे ध्येय आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.