जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केलेला रायफलमन औरंगजेब यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, या वीर जवानाच्या आईने मुलाच्या गौरवाबद्दल आनंद व्यक्त केला. मात्र, तो आज माझ्यासोबत नाही त्यामुळे मी दुःखी असून त्याच्या मृत्यूमुळे मी आतून ढासाळलेय, अशी मन हेलावणारी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.


औरंगजेब या भारतीय लष्करातील जवानाचे अपहरण करून त्याला दहशतवाद्यांनी ठार केले होते. १४ जूनला ही घटना घडली होती. औरंगजेब या जवानाला मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. त्याचबरोबर मेजर आदित्य कुमार यांनाही शौर्य चक्र देण्यात येणार आहे. भारतीय लष्करातील ४४ राष्ट्रीय रायफल्सचा जवान असलेल्या औरंगजेबच्या मृत्यूनंतर सगळा देश हळहळला होता.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथून औरंगजेब या जवानाचे दहशतवाद्यानी अपहरण केले होते. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी त्याला दहशतवाद्यांनी टॉर्चर केले. त्यासंदर्भातला एक व्हिडिओही समोर आला होता. औरंगजेब या जवानाला दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. त्याची चौकशी करण्यात येत होती असे या व्हिडिओद्वारे समोर आले होते.

या व्हिडिओत औरंगजेबला दहशतवादी गेल्या काही दिवसांमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत प्रश्न विचारताना दिसून आले. वसीम, तल्हा, समीर टायगर आणि इतर दहशतवाद्यांना कसे ठार केले? भारतीय लष्कराची रणनीती काय आहे? हे आणि इतर काही प्रश्न त्याला दहशतवादी विचारत होते. त्यानंतर त्यांनी औरंगजेबला अत्यंत क्रूरपणे ठार केले.