बलात्काराप्रकरणी २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बाबा राम रहिम सिंग याने न्यायालयात आपल्या बचावासाठी एक धक्कादायक दावा केल्याचे समोर आले आहे. मी नपुंसक असल्याचा दावा बाबा राम रहिमने केला असून शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या कुठल्याही व्यक्तीशी संभोग करण्यास असमर्थ असल्याचेही त्याने कोर्टात सांगितले होते.

२० वर्षांची शिक्षा झाल्याने बाबा राम रहिम तुरुंगात असून त्याला वाचवण्यासाठी वकिलांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. शेवटचा पर्याय म्हणून बाबा राम रहिमने न्यायालयासमोर याचिकेद्वारे एक अजब दावा केला. मी नपूंसक असल्याचे बाबा राम रहिमने म्हटले आहे. शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या कुठल्याही व्यक्तीशी संभोग करण्यास असमर्थ असल्याचा दावा राम रहिमच्यावतीने कोर्टात करण्यात आला. मात्र, न्यायमूर्ती जगदीप सिंग यांनी हे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. एखाद्या महिलेसाठी बलात्कार हा खूपच लज्जास्पद अनुभव असतो. अत्याचाराचा बळी असल्याशिवाय ती कोणावरही बेछूट आरोप करणार नाही, असे न्यायमूर्तींनी सांगितले.

बाबा राम रहिम यांच्या समर्थकांनी मला धमकावलं होतं, ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा

१९९९ सालच्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप करत बाबा राम रहिम याच्याविरोधात दोन साध्वींनी तक्रार दाखल केली होती. मात्र, बाबा राम रहिमने याचिकेत आपण १९९० पासूनच नपूंसक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या दोन साध्वींवर बलात्कार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत बाबा राम रहिमने आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा न्यायमूर्ती जगदीप सिंग यांनी या एका दाव्याच्या आधारे बाबा राम रहिमला निर्दोष ठरवता येणार नाही, असे म्हटले. या संपूर्ण प्रकरणात नपूंसकतेच्या मुद्द्यावर दुसऱ्या पक्षाने आपली बाजू मांडलेली नाही. मात्र, संपूर्ण तपासादरम्यान बाबा राम रहिमच्या पौरूषत्त्वाची कधीही चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे संशयाच्या आधारे त्याला निर्दोष मुक्त करावे, असे त्याच्या वकिलांनी म्हटले होते.

‘बाबा राम रहिमला घाबरत नाही’; अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या पीडितेची प्रतिक्रिया