ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील लाचखोरीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांनी बुधवारी सांगितले. ऑगस्टावेस्टलॅंडला हे कंत्राट मिळावे, यासाठी मध्यस्थांमार्फ त्यागी यांना लाच दिली गेल्याचा इटलीतील तपास पथकाचा आरोपही त्यांनी फेटाळला.
भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हे हेलिकॉप्टर खरेदी करताना इटलीच्या ऑगस्टवेस्टलॅंड कंपनीने भारताचे तत्कालिन हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांना मध्यस्थामार्फत लाच दिल्याची माहिती इटलीतील प्राथमिक तपासात मंगळवारी पुढे आली. फिनमेकानिका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोजफ ओर्सी यांना मंगळवारी लाच दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. याप्रकरणी इटलीतील तपास पथकातील अधिकाऱयांनी दिलेल्या अहवालात त्यागी यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दल सर्वप्रथमवृत्त दिले आहे.
आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळताना त्यागी म्हणाले, मी पूर्णपणे निर्दोष आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून, मी ठामपणे ते सर्व फेटाळतोय. या कंत्राटावर २०१०मध्ये स्वाक्षरी करण्यात आली. मात्र, मी २००७ मध्येच सेवानिवृत्त झालो होतो. केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत या प्रकरणी चौकशी करण्याचेही त्यांनी स्वागत केले.
ऑगस्टावेस्टलॅंडलाच हे कंत्राट मिळावे, म्हणून तांत्रिक नियमांत बदल करण्यात आले होत, हा आरोप फेटाळताना २००३ मध्येच तांत्रिक नियमांमध्ये बदल करण्यात आले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.