मी मुस्लीम आहे आणि मला माझा नवरा शफी जहानबरोबरच रहायचे आहे असे प्रतिज्ञापत्र हादियानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. केरळमधली अखला अशोकन या मूळच्या हिंदू असलेल्या व धर्मपरीवर्तन करून मुस्लीम झालेल्या हादिया प्रकरणावरून देशभरात एकच गदारोळ उडाला होता. लव्ह जिहादच्या अंगानंही याकडे बघण्यात येत होतं.

“मी स्वखुशीनं, सारासार विचार करून व इस्लामचा अभ्यास करून इस्लामचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतरच मी शफी जहान या त्याच धर्मातल्या व्यक्तिशी लग्न केलेलं आहे. हा निर्णय मी स्वखुशीनं घेतलेला असून कुठल्याही दबावामध्ये घेतलेला नाही,” हादियानं म्हटलं आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने हादियाची वडिलांच्या ताब्यातून मुक्तता करून तिला एका संस्थेच्या हवाली केले होते व तिचे शिक्षण सुरू ठेवण्यास सांगितले होते. गेल्या महिन्यांत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय तपास पथकालाही हादियाच्या लग्नासंदर्भात तपास करण्याचे व कुठलेही बेकायदेशीर कृत्य घडले आहे का याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.

अखिलानं शिकत असतानाच इस्लामचा स्वीकार केला व नंतर शफीशी विवाह केला. तिच्या वडिलांनी या विवाहाला विरोध केला, राष्ट्रीय तपास पथकानंही केरळमधल्या चर्चित लव्ह जिहादच्या अंगानं या प्रकरणाचा तपास केला होता. तिच्या वडिलांनी लव्ह जिहादची शंका व्यक्त केली होती. तसेच हा विवाह रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती, जी कोर्टानं मान्य केली. मात्र शफी जहान उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेला. हा खटला आता सर्वोच्च न्यायालय संपूर्ण सुनावणीच्या माध्यमातून ऐकत आहे.

मात्र, आता हादियानं आपण स्वखुशीनं मुस्लीम झाल्याचं व हा विवाह केल्याचं सुप्रीम कोर्टात म्हटलं असल्यामुळे तिचा नवऱ्यासोबत राहण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाल्याची शक्यता आहे.