‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर घणाघात केला.

राहुल गांधी म्हणाले, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल.”

“या देशाची शक्ती या देशाची अर्थव्यवस्था होती मात्र आज ती राहिलेली नाही. संपूर्ण जग मिळून भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक करत होतं. जग आशियाचे भविष्य चीन आणि भारत असल्याचं सांगत होतं. त्यामुळे या शक्तीला ‘चिंडिया’ नावानं संबोधलं जात होतं. मात्र, आता आपण दोनशे रुपये किलोनं कांदा विकत घेत आहोत. मोदींनी नोटाबंदी करुन स्वतः देशाची अर्थव्यवस्था संपवली आहे.

पी. चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांनी मोदींना सांगितल होतं की तुम्ही जीएसटी लागू करु नका. मात्र, त्यांचं काहीही न ऐकता त्यांनी म्हटलं की रात्री १२ वाजताही मी हा जीएसटी लागू करुनच दाखवणार. मात्र, त्याचा परिणाम काय झाला ९ टक्क्यांवरील जीडीपी ४ टक्क्यांवर आला. यांनी जीडीपी मोजण्याची पद्धतही बदलून टाकली आहे, जुन्या पद्धतीने जर जीडीपी मोजला तर तर देशाची अर्थव्यवस्था आज अडीच टक्केच राहिली आहे. देशाच्या सर्व शत्रूंना वाटत होते की, भारताची अर्थव्यवस्था संपावी. त्यानुसार, आज आपली अर्थव्यवस्था संपली आहे मात्र हे काम त्यांनी केलेलं नाही तर आपल्याच पंतप्रधानांनी केलं आहे. तरीही ते स्वतःला देशभक्त म्हणवून घेत आहेत, अशा कडव्या शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.

“कामगार आणि शेतकऱ्यांप्रमाणे इमानदार उद्योगपतींचाही देशाच्या जडणघडणीत वाटा असतो हे मला मान्य आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात मोदींनी अडाणीला १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ५० कंत्राटं दिली. देशाचे विमानतळ, बंदरांची काम दिली. याला आपण चोरी किंवा भ्रष्टाचार म्हणणार नाही का?” असे ते यावेळी म्हणाले.