रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यासाठीच्या पतधोरण जाहीर केले. यावेळी उपस्थित पत्रकारांना राजन यांचे काहीसे वेगळे रूप पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून सरकार आणि उद्योगपतींकडून रिझर्व्ह बँकेने व्याजदरात साधारण एका टक्क्याची कपात करावी या मागणीसाठी अप्रत्यक्षपणे दबाब आणला जात आहे. मात्र, आजच्या पतधोरणात केवळ अर्धा टक्क्याची कपात करण्याची घोषणा राजन यांनी केली. या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराकडून राजन यांना व्याजदरात अपेक्षित कपात न करण्याचा तुमचा निर्णय एकप्रकारची युद्धखोरी आहे का, असा सवाल विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून सुरूवातीला रघुराम राजन जोरजोरात हसायला लागले. तुम्ही मला काय म्हणता हे मला माहित नाही. सांताक्लॉज किंवा युद्धखोर तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते म्हणा. मी त्याचा विचार करून माझा निर्णय घेणार नाही. मी रघुराम राजन आहे आणि रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून मी मला हवं तेच करणार, असे राजन यांनी उत्तरादाखल म्हटले.
रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात अर्धा टक्क्याची कपात करण्याची घोषणा मंगळवारी केली. यामुळे रेपो दर गेल्या चार वर्षातील सर्वांत कमी म्हणजे ६.७५ टक्के इतका झाला आहे. रेपो दरात अर्धा टक्क्याने कपात केल्यामुळे गृह आणि इतर कर्जांवरील व्याजदरातही बॅंकांना कपात करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. महागाईच्या वेढ्यात अडकलेल्या सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते.