विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमधील वातावरण दिवसेंदिवस तापू लागलं आहे. राष्ट्रीय राजकारणातील मुद्द्यांचे पडसादही बंगालमध्ये उमटताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भाऊ म्हणत ममतांनी टोला लगावला आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारनं घाई गडबडीत आणलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ममतांनी केली आहे. ‘असा विरोध होत राहिला, तर सुधारणा होणार नाही. कायद्याला एक संधी द्यायला हवी. विरोधक शेतकऱ्यांचा वापर करून घेत आहे. असा आरोप सरकारकडून होत आहे,’ असा प्रश्न ममतांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या,”शेतकरी आंदोलनात एकही राजकीय नेता नाही. शेतकरी स्वतःच लढा देत आहेत. ही नवी घटना आहे. आम्ही शेतकऱ्यांना बाहेरून पाठिंबा देत आहोत. माझे भाऊ, अमित शाह म्हणाले होते की, त्यांच्याकडे ५१ लाख व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत. त्यामुळे त्यातून ते शेतकऱ्यांची बदनामी करण्यासाठी ते काही पसवू शकतात. सरकारनं माध्यमंही विकत घेतली आहेत,” असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

आणखी वाचा- मोदींच्या कार्यक्रमातील ‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीवरुन RSS ने टोचले भाजपाचे कान, पक्षाकडे केली ‘ही’ मागणी

नेताजी जयंती कार्यक्रमातील गोंधळावरून मोदींवर टीका

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात झालेल्या गोंधळावरून ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कार्यक्रमासंदर्भात केंद्रानं राज्याशी कोणतीही चर्चा केली नाही. पराक्रम दिवस काय आहे? त्यांनी साध आम्हाला विचारलं सुद्धा नाही. शासकीय कार्यक्रमाला काही प्रतिष्ठा असते. पण, राजकीय घोषणाबाजी सुरू होती. जेव्हा मी अशा कार्यक्रमांना जाते, तेव्हा ते भाजपा कार्यकर्त्यांना असं करायला पाठवतात. त्यांनी घोषणा द्याव्यात, पण पक्षाच्या कार्यक्रमात. मी कार्यक्रम होईपर्यंत तिथे होते. हे लोक का असं का करताये हे सुद्धा मी मोदींना विचारलं नाही. श्रीरामाने कुणाची पूजा केली. माता दुर्गा. मी दुर्गा मातेची पूजा करते. हिंदूत्वावर खुली चर्चा करण्यासाठी मी तयार आहे,” असं आव्हानही ममतांनी यांनी भाजपा नेत्यांना दिलं.