गेल्यावर्षी आमीर खानने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याला मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. काही विशिष्ट समुदायाच्या लोकांनी आमीरचा मोठ्या प्रमाणात निषेधही केला. अजूनही समाजमाध्यमांवर आमीर विरोधात टीका केली जात आहे. असे असतानाच बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांनी भारतातील सद्य परिस्थितीबाबत भीती व्यक्त केली आहे. आयबीएन लाइव्ह या वृत्तवाहिनीला मुलाखत देतेवेळी खेर यांनी आपली धार्मिक ओळख सांगण्याबाबत भीती व्यक्त केली.
काही बॉलीवूड सेलिब्रेटींना देशात असलेल्या परिस्थितीबाबत भीती वाटते याबद्दल तुमचे काय मत आहे असा प्रश्न खेर यांना मुलाखतीत करण्यात आला. त्यावर खेर म्हणाले की, आमच्या क्षेत्रामध्ये सर्वांनाच भीती वाटते आणि यात माझाही समावेश आहे. मी हिंदू आहे असे सांगण्यास मला भीती वाटते. जर मी डोक्यावर टीळा लावला आणि भगव्या रंगाचे कपडे घातले तर बहुतेक लोकांना मी आरएसएस किंवा भाजपच्या विचारसरणीचा आहे असे वाटेल.
काही दिवसांपूर्वीच अनुपम यांनी २०१० साली देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांवर ट्विटरद्वारे निषेध दर्शविला होता. सदर ट्विटबाबत स्पष्टीकरण देताना अनुपम म्हणाले की, २०१० साली गुन्हेगारी खटले प्रलंबित असलेल्या कलाकारास पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याचे मला वाईट वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.