बॉलीवूडचा महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी सध्या फक्त २५ टक्के कार्यरत असणाऱ्या यकृताच्या सहाय्याने जगत असल्याचे त्यांनी सांगितले. हेपेटायटिस-बी विषाणुमुळे माझ्या यकृताचा ७५ टक्के भाग निकामी झाल्याचे त्यांनी सांगितले. ते हेपेटायटिस मोहिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
मला अचानकपणे हेपेटायटिस बी ची लागण झाली. ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर मला अपघात झाल्यानंतर माझ्या शरीरात तब्बल २०० जणांचे ६० बाटल्या रक्त चढविण्यात आले. साधारण तीन महिन्यांपूर्वी मला हेपेटायटिस बी झाल्याचे निदान करण्यात आले. अपघाताच्यावेळी मला रक्तदान करणाऱ्या एका रक्तदात्याकडून हे विषाणू माझ्या शरीरात शिरले. त्यानंतर १८ वर्षे म्हणजे २००० सालापर्यंत माझे शरीर व्यवस्थितपणे काम करत होते. मात्र, मध्यंतरी केलेल्या एका वैद्यकीय चाचणीत मला सांगण्यात आले की, तुमच्या यकृताच्या ७५ टक्के भागाला संसर्ग झाला आहे. त्यामुळे आज मी तुमच्यासमोर फक्त २५ टक्के यकृताच्या सहाय्याने जगणारी व्यक्ती म्हणून उभा आहे. ही वाईट गोष्ट आहे. मात्र, चांगली गोष्ट ही आहे की तुम्ही १२ टक्के कार्यरत असणाऱ्या यकृताच्या सहाय्यानेही जगू शकता. मात्र, कोणालाही या अवस्थेचा सामना करावासा वाटणार नाही, असे अमिताभ यांनी सांगितले.