मी तेजस्वी यादव, नववी पास आहे. हे म्हणणं आहे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचे. प्राप्तिकर विभागाने बेनामी संपत्तीप्रकरणी २९ ऑगस्टला केलेल्या चौकशीत तेजस्वी यादव यांनी बहुतांश प्रश्नांना हेच उत्तर दिले. या वेळी तेजस्वी यांच्या आई आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, बहिण हेमा यादवही उपस्थित होत्या. अधिकाऱ्यांनी सुमारे सात तास या सर्वांची चौकशी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी यांना ३६ प्रश्न विचारण्यात आले. परंतु, मला काही लक्षात नाही म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.

तेजस्वी आणि त्यांच्या बहिणीने नवरतन डागा नावाच्या व्यक्तीकडून एबी एक्स्पोर्ट लि.चे शेअर घेतले होते. डागाबाबत विचारले असता, त्याला ओळखत असल्याचे तेजस्वी यांनी म्हटले. परंतु, डागा हे आपल्या पाटणा येथील घरी पुजा करण्यासाठी येत होते. पण या कंपनीच्या दुसऱ्या संचालकांबाबत आपल्याला माहीत नसल्याचे ते म्हणाले. बहुतांश प्रश्नांची त्यांनी नकारात्मक उत्तरे दिली. मी सध्या पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तुमची उत्तरे देण्यास मी असमर्थ असल्याचे त्यांनी म्हटले.

तेजस्वी यांना प्राप्तिकर विभागाने पहिला प्रश्न त्यांच्याजवळ किती संपत्ती आहे आणि उत्पन्नाचे साधन काय ? दुसरा प्रश्न होता, जमीन, घर किंवा इतर चल-अचल संपत्ती किती ठिकाणी आहे? तिसरा- या सर्व संपत्तीचा स्त्रोत काय आहे? चौथा- इतक्या कमी वेळात इतकी संपत्ती कशी कमावली? पाचवा प्रश्न- तुमचा पॅन क्रमांक काय आहे आणि विवरण पत्र कुठे दाखल करता? त्यानंतर प्राप्तिकर विभागाने यादव कुटुंबीयांशी संबंधित विविध कंपन्यांबाबत विचारले. सहावा प्रश्न होता की, तुम्ही कोणत्या कंपनीचे संचालक आहात का? तर सातवा प्रश्न होता, तुमच्या कंपन्या काय काम करतात आणि त्या कुठं-कुठं आहेत?

चौकशी दरम्यान तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय द्वेषामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्याविरोधात कट रचल्याचे म्हटले. वर्ष २०११ मध्ये तेजस्वी यांनी दिल्ली मेन्शन खरेदी केले होते. परंतु, त्यांनी २०१५ मध्ये निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केला नव्हता.