रमझानचा महिना येत्या आठ ते दहा दिवसात सुरु होतो आहे. या काळातही लॉकडाउनचे नियम पाळायचे आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये. प्रत्येकाने घरात थांबूनच नमाझ पढायला हवी असं आवाहन ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे प्रमुख ब्रद्रुद्दीन अजमल यांनी केलं आहे. देशावर करोनाचं संकट आहे. त्यामुळे याआधीही तुम्ही घरात थांबलात मशिदीत गेला नाहीत ही चांगली गोष्ट आहे. तसंच आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठीच लॉकडाउन आहे. रमझानच्या काळातही लॉकडाउनच्या नियमांचं पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे.

AIUDF चे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी काय म्हटलं आहे?
“रमझानचा महिना काही दिवसात सुरु होईल. अशा प्रसंगी मी माझ्या मुस्लिम बांधवांना आणि भगिनींकडे ही विनंती करतो की ज्याप्रकारे तुम्ही लॉकडाउनचे नियम पाळले आहेत तसेच आता रमझानच्या महिन्यातही ते नियम पाळा. महिन्याभरापासून तुम्ही मशिदीत जाणं बंद केलं. ही चांगलीच बाब झाली कारण मशिदीत गर्दी झाली असती तर करोनाचा संसर्ग वाढला असता. मात्र तसं घडलं नाही कारण तुम्ही घरात थांबलात. जुम्मा नमाजही तुम्ही मशिदीत पढली नाही. शब-ए-बारातची रात्र आली तेव्हाही तुम्ही घरातूनच नमाज पढलीत. आता असाच संयम आणखी बाळगायचा आहे. कारण करोनाचं संकट संपलेलं नाही. त्यामुळे लॉकडाउनचे नियम पाळा आणि घरातूनच नमाज पढा.. तुमची नमाज अल्लाह नक्की ऐकेल आणि लवकरात लवकर देश या संकटातून मुक्त होईल”