अॅट्रोसिटी कायद्यावरून केंद्र सरकार दलित विरोधी आहे अशी टीका विरोधकांकडून होत असताना आणि आंदोलन होत असतानाच आज आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासारखा माणूस फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच पंतप्रधान होऊ शकला असे म्हणत दलित बांधवांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्तीसगढ येथील बिजापूर याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. बिजापूर मागास राहिले कारण याआधीच्या सरकारने विकास होऊ दिला नाही असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयुष्यमान भारत योजनेचेही उद्घाटन केले. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांना जशास तसे उत्तरही दिले. मी एका गरीब आईचा मुलगा. अतिशय मागास समाजातून आलेला. आज माझ्यासारखा गरीब माणूस पंतप्रधान होऊ शकला त्याचे कारण फक्त बाबासाहेब आंबेडकरच आहेत. दलितांना समाजातील शोषित वर्गाला बळ देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचा आदर्श समोर ठेवतच आयुष्यमान भारत योजना सुरु करण्यात आली आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. समाजातील वंचित, शोषित महिलांना बळ मिळावे यासाठी ५ मे पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली, त्या घटनेने अनेक मूलभूत अधिकार दिले असूनही समाजातल्या एका वर्गाला या देशावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्ता गाजवणाऱ्यांनी मागासच ठेवले. बिजापूरसारख्या जिल्ह्यांचा विकास झाला नाही, दलितांचा विकास होऊ शकला नाही कारण काँग्रेसने कधी तशी इच्छाशक्तीच दाखवली नाही असाही आरोप आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.