18 January 2021

News Flash

देशात स्वतंत्र न्यायव्यस्थेशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही-चेलमेश्वर

१२ जानेवारीला जी पत्रकार परिषद घेतली त्यातही गैर नव्हते असेही त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र

देशात स्वतंत्र न्यायव्यवस्थेशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही असे मत जस्टिस जे चेलमेश्वर यांनी मांडले. सुप्रीम कोर्टाचे जस्टिस जे चेलमेश्वर हे शुक्रवारी निवृत्त झाले, त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. १२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काही न्यायाधीशांनी बंडाचे निशाण फडकावले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर ज्या चार न्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केले त्यापैकी एक म्हणजे जे. चेलमेश्वर होते.

न्यायाधीश रंजन गोगोई, एम. बी. लोकूर, कुरियन जोसेफ आणि जे. चेलमेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिश्रांवर टीका केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच चार न्यायाधीशांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेची धुरा जस्टिस जे चेलमेश्वर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज व्यवस्थित चालत नाही. खटला चालवण्यासाठीचे कामकाजाचे वाटप चांगल्या पद्धतीने होत नाही. कनिष्ठ न्यायाधीशांकडे महत्त्वाचे आणि संवेदनशील खटल्यांचे काम दिले जाते. पसंतीच्या खंडपीठांकडे महत्त्वाचे खटले सोपवले जातात असे आक्षेप या पत्रकार परिषदेत घेण्यात आले होते.

आता न्यायाधीश जे चेलमेश्वर हे निवृत्त झाले आहेत. अशातच त्यांनी देशात स्वतंत्र न्यायव्यवस्था हवी अन्यथा लोकशाही जिवंत राहणार नाही असे मत मांडले आहे. तसेच १२ जानेवारीला जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्याचेही त्यांनी समर्थनच केले आहे. त्या पत्रकार परिषदेवर टीका झाली मात्र मला वाटत नाही की त्यात काहीही गैर होते. आमची घुसमट आम्ही मांडली होती, मला जर त्यात काही गैर वाटले असते तर मी पत्रकार परिषदेत सहभागच घेतला नसता. जे काही घडत होते ते मांडणारा मी एकटा नव्हतो माझ्यासोबत आणखी तिघेजण होते ज्यांचे मत माझ्यासारखेच होते असेही चेलमेश्वर यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीशपदाची हुकलेली संधी

न्या. चेलमेश्वर यांची १९९७ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. मे २००७ मध्ये त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली. न्या. चेलमेश्वर यांची २०११ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली नव्हती. या दिरंगाईमुळे त्यांना देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी नाकारली गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 6:59 am

Web Title: i believe that without an independent judiciary no democracy can survive says justice j chelameswar
Next Stories
1 सैन्याचे ‘ऑपरेशन ऑल आऊट २’; हे टॉप ९ दहशतवादी हिटलिस्टवर
2 आयसिसच्या काश्मीरमधील म्होरक्याचा अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचा कट?
3 ‘आधार’च्या बायोमेट्रिक डेटाचा वापर गुन्ह्यांच्या तपासासाठी करता येणार नाही: UIDAI
Just Now!
X