News Flash

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे मुश्कील: मोदी

'शिवाजी महाराजांचे संघटन कौशल्य अफाट होते'

मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो

महाराष्ट्राच्या कडेकपारीत ज्यांच्या नावाचा अखंड गजर होतो अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले आहे. मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘शिवाजी महाराज हे सत्य आणि न्यायासाठी लढणारे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत. जय शिवराय.’ या ट्विटमध्ये मोदींनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मोदींनी वेळोवेळी आपल्या भाषणांदरम्यान शिवाजी माहाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख आहे. या व्हिडीओमध्ये मोदी म्हणतात, ‘आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. त्यांनी अनेक संकटे असतानाही आपल्या योग्यता आणि क्षमतेच्या आधारे सुशासन आणि प्रशासनाचा भारतीय इतिहासात नवा अध्याय लिहीला. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे मुश्कील आहे, ज्यांनी संघर्ष करत असतानाही सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.’ त्यापुढे मोदींनी प्रभू रामचंद्रांच्या दाखला देत शिवाजी महाराजांची स्तृती केली आहे. ‘प्रभू रामांनी लहान लहान लोकांना, वानरांना एकत्र करुन आपली सेना स्थापन केली आणि विजय मिळवला. तशाच पद्धतीने शिवाजी महाराजांची संघटन कौशल्य वापरून शिवाजी महाराजांनी शेतकरी आणि मावळ्यांना संघटित करुन युद्धासाठी तयार केले,’ असंही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान आज देशभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरही आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. समृद्ध आणि कणखर महाराष्ट्राचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज मानवंदना वाहण्यात येत असून, विविध माध्यमातून अनेकांनीच या राजाचं राजेपण जपत त्यांना अभिवादन केल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 8:51 am

Web Title: i bow to chhatrapati shivaji maharaj on his jayanti pm narendra modi
Next Stories
1 जैश-ए-मोहम्मदच्या 21 दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, तीन आत्मघातकी हल्ल्यांची योजना
2 जय शिवराय! जगभरातील संशोधक आणि तज्ज्ञ शिवरायांच्या कार्याने प्रभावित, म्हणतात…
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X